Wednesday, December 31, 2014

गोष्ट हातातली होती ..

गोष्ट हातातली होती .. !!
लेखक - व पु काळे

 वाचनात आलेल सुंदर पुस्तक . . "गोष्ट हातातली होती "  !!




घराघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि मानवी जीवनातलं अव्यक्त ते व्यक्त होऊ लागलं..

पूर्व म्हणाली, “केवळ काटकोनात आपल्याला उभं केलंय म्हणून आपल्याला भिंत म्हणतात. आपली माती एकच आहे.   अंतरंग आणि बहिरंग ह्यात फरक नाही. आपण कुणाचंही विभाजन करीत नाही. माणसांनी त्यांच्या सोयीसाठी खोल्या केल्या. आपण त्यांना साथ दिली. माणसंही माणसांना एवढी साथ देत नाहीत.

माणसामाणसातल्या भिंती आपल्यापेक्षा पक्क्या बांधणीच्या. अहंकाराच्या विटांवर नम्रतेचं, निगर्वीपणाचं प्लॅस्टर. पक्कं बांधकाम. आपल्याला अहंकार नाही ह्याचाच अहंकार. आणि हे दर्शविण्यासाठी सोहळे !” पश्चिम म्हणाली, “मला माणसामाणसांतले हे व्यवहार कळत नाहीत. 

अहंकार नात्यानात्यांत गैरसमज निर्माण करतो. तुमची मैत्री जीवापाड असेल तर गैरसमज निर्माण होण्याचं काहीच कारण नाही. मैत्रीतच सुरक्षितता वाटली पाहिजे. भिंतीमध्ये ओल आली म्हणजे माणसं आर्किटेक्ट, इंजिनियर सगळ्यांचे सल्ले घेतात. जगातला कुठलाही इंजिनियर ठराविक ठिकाणी ओल का येते, हे सांगू शकणार नाही. कारण ते असतात भिंतीचे अश्रू !”

Sunday, December 28, 2014

सर सुखाची . .

सर सुखाची... !!!



गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना .. 
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना.. 
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना ..
तोल माझा सावरू दे थांब ना ..

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा.. 
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा ..




सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला..
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला..
खेळ हा तर कालचा…खेळ हा तर कालचा…
पण आज का वाटे नवा.. 
कालचा हा खेळ बघ वाटे नवा..

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे..
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे..
वाटतो आता…वाटतो आता…उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा..
उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा...

******************************************************************************************
सुंदर शब्द.. सुंदर गीत . .
 चित्रपट :- मंगलाष्टक वन्स मोअर
 गीतकार :- गुरु ठाकूर 


Tuesday, December 2, 2014

मी मलाच सापडतीय नव्याने ...

मी मलाच सापडतीय नव्याने... 

प्रत्येक नात्यात... 

वेगळ्या रुपात... !


खोल खोल कोशात शिरलेली ढिम्म नजर एकाएकी खडबडून वर उठावी अन् दूर आभाळाकडे झेपवावी तसं काहीतरी झालं..! म्हणजे बघा ना, सगळं इथेचं, माझ्या नजरेसमोरंच तर होतं पण तरी, कुठलीशी झापडं माझ्या दोन्ही डोळ्यांवर हात गच्च धरून उभी होती... मी कुठल्या अंधारात वावरत होते माहित नाही पण आता सगळं लख्खं दिसतंय.. अगदी स्पष्ट...!
हा जगण्याचा आटापिटा तरी कशासाठी..? सांगू शकाल ..? आपल्याला कुणीतरी हक्काचं, आपलं, म्हणावं म्हणूनच ना...! मग आपणही जन्मभर शोधत राहतोच ना तो आपला एकुलता एक अवलिया...       हो एकुलताच...!
एखादाचं हवाय ना.., म्हणून..!
पण, इथंच तर खरी गोम आहे..नाही का ..?
माझी म्हणावी अशी कैक माणसं आहेत माझ्याकडे पण मी कधी त्यांना निरखून पाहिलंच नाही.. कधी त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयीची माया पाहण्याचा प्रयत्नही केला नाही.. सतत एकिटीची सोबत केली.. खाली मान घालुन स्वतःच्याच नशिबावर अनेकदा ताशेरे ओढले.. पण, आता कळतंय.. माझी म्हणायला तेंव्हाही बरीच माणसं होती पण मी मात्र त्यावेळी कुणाच्यातचं नव्हते, अगदी माझ्यातसुध्दा... पण, आता उमगतयं..  तो हात दुर होतोय ना, बंद डोळ्यांवरून तसंतसं कळू लागलयं...
एकाकीपण कधीच मागे गळून पडलयं... वर्षानुवर्षे जोडत आलेला सगळा गोतावळा आता खुणावतोय... मानलेली, जोडलेली, रक्ताची सगळी सगळी नाती माझ्या भोवती हातात हात घालून गोल फेर धरतायेत, अन् मी मध्यावर उभी हात उंचावून जगण्याचा उत्सव साजरा करतीय... :)
स्वप्नवत वाटतयं ना...! पण हेच खरयं...!


मी मलाच सापडतीय नव्याने... प्रत्येक नात्यात... वेगळ्या रुपात... !



------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------